Choose growth vs dividend in mutual fund marathi
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक ही ज्या दिवशी आपण गुंतवणूक करणार आहोत त्या दिवसाच्या NAV ने गुंतवणूक होते. म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर आपणास त्या किमतीचे युनिट्स मिळतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना आपल्यासमोर दोन पर्याय असतात. एक growth म्हणजे वृद्धी आणि दुसरा dividend म्हणजे लाभांश. यातील कुठला पर्याय आपणास योग्य आहे . या दोन्ही पर्यायांमध्ये फायदे आहेत आणि तोटेही आहेत. आपली गरज ओळखून योग्य पर्याय निवडावा.
वृद्धी पर्याय – Growth Option
वृद्धी (Growth) या पर्यायामध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून मिळालेला नफा हा पुन्हा गुंतवला जातो (याच नफ्यातून फंडास अधिक गुंतवणूक करता येते). यातून कुठल्याही प्रकारे गुंतवणूकदारस रोख रक्कम मिळत नाही. नफा पुन्हा गुंतवणूक होत असल्यामुळे युनिट्स ची NAV वाढत जाते. अर्थात आपल्या गुंतवणूकीचे मूल्य वाढते. युनिट्स ची विक्री केल्यानंतरच मुद्दल आणि नफा मिळतो.
लाभांश पर्याय – Dividend Option
या पर्यायांमध्ये म्युच्युअल फंडा मध्ये मिळालेला नफा हा लाभांश रूपाने सभासदांमध्ये युनिट प्रमाणे वाटला जातो. या लाभांशामुळे युनिट्स ची NAV त्या प्रमाणात घटते.
उदाहरणांद्वारे स्पष्टीकरण
म्युच्युअल फंडास होणाऱ्या नफ्यातून काही भाग हा लाभांश रूपाने प्रति युनिट्स प्रमाणे गुंतवणूकदारांना वाटला जातो. याचा युनिट्स NAV वर काय परिणाम होतो हे खालील उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
प्रति युनिट्स चे मूल्य (NAV): रुपये १०
युनिट्स ची संख्या : १००
गुंतवणुकीचे मूल्य: १० x १०० = १०००
समजा वरील गुंतवणुकीस रुपये २ प्रति युनिट असा लाभांश जाहीर झाला तर
युनिट्स ची संख्या : १००
लाभांश: १०० x २ =२०० रुपये
लाभांश वाटप झाल्यानंतर युनिट्स मूल्य
युनिट्सची संख्या : १००
लाभांश वाटप झालेनंतर युनिट्स चे मूल्य : रुपये ८
गुंतवणुकीचे मूल्य: १०० x ८ = ८००
गुंतवणुकीचे नवीन मूल्य + लाभांश (८००+२००) =१००० रुपये असे होईल.
म्हणजेच लाभांश वाटप केल्यानंतर युनिट्स चे नक्त मूल्य (NAV) कमी होते. थोडक्यात म्युच्युअल फंडास मिळालेल्या नफ्यातून जी रक्कम युनिट धारकास वाटप केली जाते त्या प्रमाणात युनिट्स मूल्यामध्ये घट होते. अखेरीस गुंतवणूक मूल्य तेवढेच राहते.
म्युच्युअल फंड खरेदी करताना वृद्धी हा पर्याय निवडला असेल तर फंडास मिळणार नफा हा पुन्हा गुंतवला जातो. त्यामुळे फंड युनिट्स चे NAV वाढत जाते. कालांतराने युनिट्स ची विक्री केल्यानंतर आपणांस गुंतवणूक केलेली रक्कम आणि नफा मिळतो.
म्युच्युअल फंड खरेदी करताना लाभांश हा पर्याय निवडला असेल तर युनिट्स चे NAV कमी होते. वेळोवेळी जाहीर झालेला लाभांश गुंतवणूकदारास मिळतो.
खालील फंड हा लाभांश आणि वृद्धी या दोन्ही पर्यायामध्ये असून १ मार्च, २०१७ रोजी त्यांचे असलेले मूल्य (NAV) दिलेले आहे. या दोन NAV मध्ये खूप फरक आहे असे दिसून येईल.
१ मार्च, २०१७ – ICICI Prudential Value Discovery Fund – Dividend Option – NAV 33.45
१ मार्च, २०१७ – ICICI Prudential Value Discovery Fund – Growth Option – NAV 128.48
म्युच्युअल फंडाची NAV बघण्यासाठी येथे क्लिक करा.
म्युच्युअल फंड लाभांश (Mutual Fund Dividend) कराच्या (Tax) दृष्टीने:
Equity म्युच्युअल फंडामध्ये मिळणारा लाभांश करमुक्त असतो तसेच संतुलित (balanced fund) फंड ज्याची 51% गुंतवणूक equity या पर्यायामध्ये आहे त्यावरही लाभांश करमुक्त आहे.
वरील दोन्ही पर्यायांपैकी कुठला पर्याय निवडावा.
जर आपण निवृत्त आहात, दुसरे कुठलेही उत्पन्न नाही किंवा वेळोवेळी पैसे मिळणे हि आपली गरज असेल तर लाभांश हा पर्याय निवडावा. अन्यथा पैशांची गरज नसल्यास वृद्धी हा पर्याय निवडावा. गुंतवणुकीच्या दृष्टीने वृद्धी हा पर्याय योग्य आहे कारण सहसा गुंतवणूकदार मिळालेली रोख रक्कम पुन्हा गुंतवणूक करत नाही.
0 टिप्पण्या