श्री विष्णू सहस्त्रनाम श्लोक मराठी भावार्थ श्लोक २ | vishnu sahastranam marathi Bhavarth shlok 2

विष्णुसहस्रनाम : श्लोक २

vishnu sahastranam marathi Bhavarth shlok 2
vishnu sahastranam marathi Bhavarth shlok 2

  श्री विष्णु सहस्रनाम श्लोक भावार्थ श्लोक २

      पूतात्मा परमात्माच मुक्तानां परमागतिः ।
      अव्यय पुरूषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एवच ।

🚩⚜️🌹(१०) पूतात्मा : - जे तत्व अत्यंत शुभ स्वरूपात आहे असा अथवा जो मायेच्या अशुद्धतेने यत्किंचीतहि गढुळलेला नाही असा पूतात्मा श्रीविष्णु. परमात्मा हा वासनांच्या पलिकडे असतो त्यामुळेमायेचा परिणाम म्हणजे बुद्धिची विचारग्रस्तता, मनाचे भावविवश होणे किंवा शरीर विषयाधीन होणे हे त्याच्या ठिकाणी संभवतच नाहीत. तो सदैव निष्कलंकच असतो म्हणूनच त्याला पूतात्मा (शुद्ध आत्मा) म्हटले आहे.

🚩⚜️🌹(११) परमात्मा : - सर्वश्रेष्ठ आत्मतत्व, जे तत्व प्रकृतीच्या सर्व बंधनाच्या व अपूर्णतेच्या पलीकडे आहे म्हणजेच परात्पर सत्य आहे ते. आत्मा हा प्रकृतीहून भिन्न आहे. त्याच्याच साक्षीने (अस्तित्वाने) प्रकृतीचे हे आवरण, त्याच्याचपासून शक्ति मिळवून सर्वकाल नियमितपणे आपली क्रीडा करीत असते. सर्ववैदिक वाङमयांत व उपनिषदांत हे सत्य एकमुखाने वरचेवर उद्घोषित केले आहे. आत्मबोध ह्या आपल्या ग्रंथामध्ये शंकराचार्यांनी म्हटले आहे किं आत्मा 1 हा तीनही देहांपासून भिन्न आहे. वतो एखादा राजा ज्याप्रमाणे देशावर सत्ता गाजवितो त्याप्रमाणे ब्रह्मांडावर सत्ता 2 ठेवतो. त्याच ग्रंथात असे म्हंटले आहे किं सूर्यापासून शक्ति मिळवून ज्याप्रमाणे जगत् कार्यान्वित होते, त्याप्रमाणे आत्म्याच्या 3 शक्तिने प्रकृति कार्यान्वित होते.
कठोपनिषद् 4 व गीता ह्यामधून आपल्याला असे मार्गदर्शन मिळते किं ' आपल्या व्यक्तिमत्वाचे बाह्यस्तर एका मागे एक ओलांडीत आपण सर्वांत अंतस्थ केंद्रापर्यंत गेलोतर तेथे तेच परात्पर अनंत तत्व असून त्याचीच सर्व अधिसत्ता आहे.' असे आपले आचार्य सांगतात. थोडक्यात जो कार्यकारण भावातीत आहे, मायातीत आहे तोच परमात्मा होय. विष्णुपुराणामध्ये 5 नन ह्या परमात्म्याची स्तुती ''श्री महाविष्णू '' या नांवाने केली आहे.

🚩⚜️🌹 (१२) मुक्तानां परमागतिः । : - मुक्तावस्थेला गेलेल्या सर्वांचे जो उच्चतम असे ध्येय असतो तो. मनुष्यांना अनुभवास येणारी बंधने व मर्यादा ही प्रकृतीचीच बंधने असतात, तिच्यां आवरणाचे परिणाम असतात. अज्ञानाने मोहवश होवून आपण त्यांच्याशी तादात्म्य पावतो व ती खरी मानतो. त्यामुळेच अपूर्णतेचे दुःख आपणांस सहन करावे लागते. ह्या गुलामगिरीतून आपली मुक्तता करून घेणे म्हणजेच आत्मज्ञान करून घेणे. म्हणूनच सत्याची व्याख्या 'मुक्त झालेल्यांचे परमध्येय '' अशी केली आहे.
जे ध्येय गाठावयाचे त्यालाच संस्कृतमध्ये 'गति ' असा शब्द आहे. परमगति म्हणजे जेथून पुन्हा परत येणे संभवत नाही अशीच होय. जेथे पोहोचले असतां मनुष्यास परत यावे लागत नाही ते माझे ' परमधाम ' आहे . असे गीतेच्या १५व्या अध्यायात म्हटले आहे. (यद्‍गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम - गीता १५ -६) हीच कल्पना गीतेमध्ये श्रीकृष्णांनी पुन्हा स्पष्ट केली आहे. ''हे कुंतीपुत्रा, जे मला येवून मिळतात त्यांना पुनर्जन्म प्राप्त होत नाही. ( मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते - गीता ८-६)
तसेच या ध्येयाची व्याख्या करतांना ' ज्या ठिकाणी गेले असतां पुन्हा यावे लागत नांही ते' अशी केली आहे. (यस्मिन् गत्वा न निवर्तन्तिभूय: - गीता १५ - ४)

🚩⚜️🌹 (१३) अव्ययः : - व्यय म्हणजे नाश. बदल झाल्याखेरीज नाश संभवत नांही. अर्थात जो विनाशरहित (अव्यय) आहे त्याचेमध्ये बदल होत नाही. विनाशरहित परमात्मा अर्थातच परिणाम रहित आहे. परिणाम अगर परिवर्तन म्हणजे एका स्थितीचे मरण व दुसर्‍या स्थितीचा जन्म होय. सत्चिदानंद स्वरूप ब्रह्म हे अनादि व अव्यय आहे व त्याखेरीज इतर सर्व सजीव निर्जीव जगत् हे परिवर्तनाच्या- विनाशाच्या तडाख्यात सापडते. परंतु ज्याच्या आधाराने हे सर्व बदल घडतात ते ब्रह्मतत्व मात्र 'अव्यय' आहे. उपनिषदांनी त्याचे स्तवन 'अजरो - अमरोऽव्ययः ' ते ब्रह्म जरा मृत्युरहित परिवर्तन रहित आहे असे केले आहे.

🚩⚜️🌹 (१४) पुरूषः - पुरिशेते इति पुरूषः । : - जो पुर - नगरीमध्ये रहातो तो पुरूष. ऋषींनी ह्या ठिकाणी शरीराला एका भव्य दुर्ग अगर नगराची उपमा दिली आहे व त्याला नऊ द्वारे आहेत असे म्हटले आहे. ( नवद्वारे पुरे देही - गीता ५-१३) व या पुरामध्ये राहून जो त्याच्यावर राज्य करतो तो पुरूष.

ह्याच शब्दाचा आणखी दोन तर्‍हेनें अर्थ करता येईल व त्यावरून आपल्याला आत्मस्वरूपाचा जास्त सूक्ष्म अर्थ समजून येईल. पुरा आसित् इति पुरूषः : - जो सर्वप्राणी मात्रांच्याहि पूर्वी होता तो. (१) किंवा (२) पूरयति इति पूरूषः । म्हणजेच जो सर्व आस्तित्व पूर्णतेला नेतो तो पुरूषः ज्याच्या वाचून जगताचे अस्तित्व संभवतच नाही तो परमात्मा, हा परमात्मा सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी जीव ह्या स्वरूपात रहातो. त्याच्यामुळेच प्राणीमात्रांच्या शारिरिक, मानसिक व बौद्धिक क्रिया घडत असतात. ह्या क्रियांमध्ये तो ग्रस्त होत नाही तर साक्षीरूपानें सर्व क्रिया पहात असतो. ही कल्पना पुढील पदामध्ये जास्त स्पष्ट होईल.

🚩⚜️🌹 (१५) साक्षीः : - पहाणारा - साक्षी म्हणजे घडणार्‍या घटनांचे जो व्यक्तिगत हितसंबंध अगर मानसिक गुंतवणूक न ठेवता निरीक्षण करतो तो असा सामान्यतः अर्थ केलो जातो. ( साक्षात् द्रष्टारि - साक्षीस्यात् अमरकोश) प्रत्येकाचे हृदयातील ज्ञानवान् आत्मा म्हणजेच तो परमात्मा होय. ( गीता १३ - ३) असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. ह्या आत्म्यामुळेच सर्व गोष्टींचे ज्ञान होते तरी तो केवळ साक्षी आहे. कारण त्याचेमध्ये कोणतेही बदल संभवत नाहीत. ज्याप्रमाणे सूर्य सर्व जगताला प्रकाशित करतो परंतु जगताच्या कुठल्याही परीस्थितीचा सूर्यावर काहीही परिणाम होत नाही त्याचप्रमाणे हा परमात्मा विष्णु सर्व विश्व प्रकाशित करतो परंतु त्यामध्ये स्वतः ग्रस्त होत नाही.

पाणिनी सूत्राप्रमाणे साक्षी शब्दाची उकल स+ अक्षि अशी होते व त्याचा अर्थ ' प्रत्यक्ष पहाणारा ' असा होतो.

🚩⚜️🌹 (१६) क्षेत्रज्ञ : - ज्याला शरीर व शरीरांत घडणार्‍या घटनांचे ज्ञान असते तो शरीर क्षेत्राचा ज्ञाता - क्षेत्रज्ञ होय. ब्रह्मपुराणांत असा उल्लेख आहे किं सर्व शरीरेही क्षेत्रे आहेत व त्या सर्वास आत्मा अत्यंत सहजतेने (प्रयत्नावाचून ) प्रकाशित करतो, म्हणून तो क्षेत्रज्ञ आहे.

🚩⚜️🌹 (१७) अक्षर : - विनाशरहित. सान्त वस्तू दिक्कालाच्या बंधनाने सीमितच असतात परंतु अनंतहे बंधनातीत आहे. म्हणूनच अक्षर आहे, ते अविनाशी असल्यामुळे प्रकृतीच्या विनाशकारी नियमांच्या अगर मनुष्यकृत संहाराच्या तडाख्यांत सापडत नाही. ते संहारक शस्त्रानी छेदले जात नाही. अग्नि त्यास जाळू शकत नाही, जलाने ते भिजवता येत नाही व पवनाने त्याचे शोषण होत नाही. (गीता २-२३). ते ब्रह्म अक्षर आहे. अक्षरंब्रह्म परमम् ( गीता ८-३).

या ठिकाणी हे लक्षांत घ्यायला हवे किं या श्लोकांत 'एव' हा शब्द जास्त आला आहे व त्याचा अर्थ ''क्षेत्रज्ञ हाच अक्षर आहे'' असा होतो. त्याचेमध्ये फरक नाही. क्षेत्राचा ज्ञाता व क्षेत्र यांत फरक नांही.

साभार.....🙏

श्लोक ३

श्लोक ४

श्लोक ५

श्लोक ६

श्लोक ७

श्लोक ८

श्लोक ९

श्लोक १०

श्लोक ११

श्लोक १२

श्लोक १३

श्लोक १४

श्लोक १५

श्लोक १६

श्लोक १७

श्लोक १८

श्लोक १९

श्लोक २०

श्लोक २१

श्लोक २२

श्लोक २३

श्लोक २४

श्लोक २५

श्लोक २६

श्लोक २७

श्लोक २८

श्लोक २९

श्लोक ३०

श्लोक ३१

श्लोक ३२

श्लोक ३३

श्लोक ३४

श्लोक ३५

श्लोक ३६

श्लोक ३७

श्लोक ३८

श्लोक ३९

श्लोक ४०

श्लोक ४१

श्लोक ४२

श्लोक ४३

श्लोक ४४

श्लोक ४५

श्लोक ४६

श्लोक ४७

श्लोक ४८

श्लोक ४९

श्लोक ५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या